चंद्रपूर : १४ एप्रिल – मोहफुल वेचायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना नागभीड तालुक्यातील येनोली ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या धामनगाव चक लगतच्या गट क्रमांक 70 मध्ये घडली. विक्राबाई खोब्रागडे असे मृतक महिलेचे नाव आहे.
ग्रामीण भागात सद्या मोहफुल वेचणीच्या व्यवसाय सुरू आहे. जंगलव्याप्त भागातील नागरिक मोठ्या संख्येने पहाटेच्या सुमारास जंगलात जातात. हिच संधी साधून वन्यप्राणीही मानवांवर हल्ले करीत असल्याचे चित्र मागील काही दिवसात समोर आले आहे. मृतक महिला काही सहकार्यांसोबत घोडाझरी मुख्य कालव्याच्या जंगलात मोहफुल वेचणीसाठी गेली होती. मोहफुल वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती सहकारी लोकांनी गावात दिली. वनाधिकार्यांना तात्काळ याबाबतची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.