पंढरपूर : १४ एप्रिल – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होत असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. हे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग लागेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केला. पाटील यांच्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही येथे प्रचारसभेत सत्ताबदलावर मोठे विधान केले होते.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सध्या प्रचार चांगलाच तापला आहे. येथे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होत असून आरोपप्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभांनी वातावरण ढवळून निघालं असताना आता भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रचारात उतरले आहेत. पाटील यांनी आज मंगळवेढ्यात गल्लोगल्ली जावून प्रचार केला. यावेळी माध्यमांशी बोलताना समाधान आवताडे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सरकारच्या भवितव्यावर पुन्हा एकदा भाष्य केले. हे सरकार पडणार आहे हे इयत्ता आठवीतील मुलगाही सांगू शकेल, असे विधान पाटील यांनी केले. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. सरकारकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसत नाही. त्यामुळे निर्णय प्रक्रिया थांबली आहे. या स्थितीत हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाटील यांनी लक्ष्य केले. उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख म्हणून जन्माला आले पण शरद पवार यांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री केले. वस्तुस्थिती अशी आहे की, उद्धव ठाकरे यांना अनेक गोष्टी माहितच नाहीत. स्वत: पीपीई किट घालून फिल्डवर उतरल्याशिवाय त्यांना प्रश्न कळणार नाहीत, असा निशाणा पाटील यांनी साधला.