वर्धा : १४ एप्रिल – महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर रुग्णालयात बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणी डॉक्टराने हिंगणघाट पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. संबंधित घटना हिंगणघाटच्या निर्मेश कोठारी यांच्या रुग्णालयात घडली आहे. या घटनेनंतर बराच काळ रुग्णालयातील सेवा बंद ठप्प झाली होती.
संबंधित मृत रुग्णाचं नाव सत्तार अयुब खान असून त्यांची कोरोना चाचणी 10 एप्रिल रोजी करण्यात आली होती. पण प्रशासनातील ढिसाळपणामुळे रुग्णाचा रिपोर्ट तीन दिवसानंतर देण्यात आला. तोपर्यत संबंधित रुग्णावर घरीच उपचार सुरू होते. रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर, काल रात्री उशीरा रुग्णाला हिंगणघाट येथील डॉक्टर निर्मेश कोठारी यांच्या रुग्णालयात आणण्यात आलं. रुग्णालयात आल्यानंतर रुग्णाची तपासणी केली असता, रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
यावेळी आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकताच रुग्णाचा मुलगा सलमान उर्फ गोलू सत्तार खान याने डॉक्टरांना मारहाण केली आहे. मुलगा सलमानने डॉक्टरच्या थोबाडीत मारल्यानंतर बराच वेळ रुग्णालयाच गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं. यानंतर संबंधित डॉक्टराने हिंगणघाट पोलिसांत मारहाणीची तक्रार दाखल केली. संबंधित आरोपी मुलगा सलमान सत्तार खान विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांनी दिली.
या घटनेनंतर डॉक्टरांनी मारहाणीच्या निषेर्धात रुग्णसेवा ठप्प केली होती. पण पोलिसांनी डॉक्टरांशी चर्चा करून प्रकरण तुर्तास मिटवलं आहे. तसेच संबंधित मृत रुग्णावर अद्याप अत्यंसंस्कार करण्यात आले नाहीत. त्यामुळे आरोपी मुलाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.