मुंबई : १३ एप्रिल – आयपीएलच्या चौदाव्या हंगामात सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या संघात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानचा ४ धावांनी निसटता पराभव झाला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात ६३ चेंडूत ११९ धावांची खेळी केली. यात १२ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. पण त्याला दुसऱ्या बाजूने फारशी साथ न लाभल्याने राजस्थानने हा सामना गमावला. परंतु सॅमसनने केलेल्या खेळीचे आजी-माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केले.
संजू सॅमसनच्या वादळी खेळीचे चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने कौतूक केले. या संदर्भात त्याने ट्विट केले आहे. यात त्याने, संजू सॅमसनने उत्कृष्ट खेळी केली. तू तुझ्या खेळीने अनेकांची मनं जिंकलीस. असाच खेळत राहा, म्हटलं आहे.
सुरेश रैनासह मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही सॅमसनचे त्याच्या खेळीबद्दल अभिनंदन केले. ‘सॅमसनसाठी खूप आनंद झाला. त्याने उत्कृष्ट खेळी केली. टॉप क्लास,’ असे बुमराह म्हटलं आहे.
व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांनी देखील सॅमसनच्या खेळीचे कौतुक केले. दरम्यान, पंजाबने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत केएल राहुलच्या ९१ आणि दीपक हु्डडाच्या ६४ धावांच्या जोरावर २२१ धावा केल्या होत्या. पण राजस्थानला २१७ धावा करता आल्या. राजस्थानला अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना सॅमसनने सीमारेषेवर झेलबाद झाला.