नागपूर : १३ एप्रिल – कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने नवीन रुग्णांना बेड देखील उपलब्ध होणे कठीण झाले आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयांची क्षमता केव्हाच पूर्ण झाल्याने रुग्णांना वणवण भटकावे लागत आहे. या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी मानपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयांमध्ये रिक्त बेडची कमतरता लक्षात घेता मानकापूर इनडोअर स्टेडियमवर येत्या 7 दिवसात 500 खाटांचे रुग्णालय तयार करावे, अशी सूचना महापौरांनी केली आहे.
नागपुरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गंभीर रूग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रशासनाने निर्बंध लागू करूनही शहरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. या गंभीर परिस्थितीत राज्य सरकारनेही पूर्वीच्या घोषणेनुसार अतिरिक्त १००० खाटांची व्यवस्था करावी. यासंदर्भात पालकमंत्री लगेच निर्णय घेण्याचे आवाहन तिवारी यांनी केले आहे.
नागपूर शहरात रेमेडिसीव्हर इंजेक्शनची कमतरता आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी मनपाने त्वरित ५ हजार इंजेक्शनची खरेदी करण्याची गरज असल्याचे महापौर म्हणाले.