मुंबई : १३ एप्रिल – विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मी राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो असं वक्तव्य केलं आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. या निवडणुकीत समाधान आवतडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिलात तर यांचा मी करेक्ट कार्यक्रम केला म्हणून समजा असं ते यावेळी म्हणाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“आमच्या त्यांना कायम शुभेच्छा आहेत. फडणवीस किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षाचे नेते व्यक्तीगत शत्रू नसतात. राजकारणात वैचारिक लढाई असते ती आम्ही निवडणुकीत लढू. त्यामुळे विरोधी पक्षांना आमच्या शुभेच्छा आहेत. सरकार पाडण्याची नवीन तारीख त्यांनी ठरवली असेल तर त्यासाठीही शुभेच्छा आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“सर्व घटकांवर अन्याय करणारं हे सरकार आहे. या सरकारचे १०० अपराध भरले आहेत. १०० अपराधानंतर पहिली संधी पंढरपूरच्या जनतेला, नागरिकांना मिळाली आहे. या निवडणुकीत यांचा कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करून दाखवतो. या निवडणुकीत समाधान आवतडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिलात तर यांचा मी करेक्ट कार्यक्रम केला म्हणून समजा. त्याची चिंता तुम्ही करु नका,” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.
या सभेत फडणवीसांनी संजय राऊत यांचं नाव न घेता टीका केली होती. “करोना काळात केंद्र सरकारने राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात मदत केली. राज्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिल्याने आज देशात नंबर 1 चे लसीकरण महाराष्ट्र राज्यात झाले. मात्र मुख्यमंत्री विरोधी पक्षाला राजकारण करू नका म्हणून सांगतात आणि त्यांच्याच पक्षाचे कोणीही सोम्यागोम्या उठतो आणि विरोधी पक्षावर टीका करतो,” अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता केली.
“मला खासदार निंबाळकर यांनी आता पावसात सभा घेण्याची तुमची वेळ आहे असं सांगितलं. आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो ही निवडणूक एका मतदारसंघाची निवडणूक असली तरी महाराष्ट्रात ही निवडणूक एक नवीन विचार आणि मार्ग घेऊन येणार आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.