अविनाश पाठक लिखित दृष्टीक्षेप या पुस्तकाला साहित्य विहारचा उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार…

नागपूर : २०फेब्रुवारी –  विदर्भातील वाङमयीन क्षेत्रात आघाडीची संस्था असलेल्या साहित्य विहार तर्फे आयोजित राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार २०२० मध्ये उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी यंदा नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि स्तंभलेखक श्री. अविनाश पाठक यांनी लिहिलेल्या दृष्टीक्षेप या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे.रोख रकम, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २७ फेब्रुवारी२०२१ रोजी दुपारी ३वाजता नागपुरात आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार  प्रदान करण्यात येणार आहेत. 

दृष्टीक्षेप हा अविनाश पाठक यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या घ्या समजून राजे हो या लेखमालिकेतील निवडक २२ लेखांचा संग्रह असून त्यात विविध विषयांवरील लेखांचा समावेश आहे. ज्येष्ठ पत्रकार श्री. लक्ष्मणराव जोशी यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. 

अविनाश पाठक  यांची आतापर्यंत १४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात मराठी वाङ्मय व्यवहार :चिंतन आणि चिंता हे संपादित पुस्तक, पूर्णांक सुखाचा ही  लघु कादंबरी, काळ्या कोळशाची काळी  कहाणी हे कोळसा घोटाळ्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक, डावपेच आणि सत्तेच्या सावलीत हे राजकीय कथासंग्रह, आठवणीतले नेते, गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश, हितगुज आणि थोडं आंबट थोडं गोड  हे पाच ललित लेखांचे संग्रह तसेच दाहक वास्तव, मागोवा घटितांचा, कालप्रवाहाच्या वळणावरून आणि  दृष्टिक्षेप हे वैचारिक लेखांचे संग्रह या पुस्तकांचा समावेश आहे. 

अविनाश पाठक लिखित मराठी वाङ्मय व्यवहार चिंतन आणि चिंता, पूर्णांक सुखाचा, डावपेच आणि आठवणीतले नेते ही  पुस्तके  विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहेत. अविनाश पाठक  संपादित रामटेकच्या गडावरून या दिवाळी अंकानेही २५ च्या वर प्रतिष्ठित पुरस्कार मिळविलेले  आहेत. याशिवाय पत्रकारितेतील योगदानाबद्दल पाठक  यांना  नागपूरकर भोसले परिवाराचा राजरत्न पुरस्कार, मातोश्री पुरस्कार, बहिणाई पुरस्कार, महाराष्ट्रदीप  पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी  सन्मानित करण्यात आले आहे.नुकतेच म्हणजे १३ जानेवारी २०२१ रोजी नाशिक येथील पत्रकार संघाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन अविनाश पाठक यांना सन्मानित करण्यात आले आहे.

सध्या अविनाश पाठक हे नागपूर इन्फो या न्यूज पोर्टलचे संपादकीय सल्लागार म्हणून कार्यरत असून त्याचबरोबर गावकरी नाशिक, नवशक्ती मुंबई, बित्तंबातमी,ठाणे आणि श्रमिक एकजूट नांदेड या दैनिकात नियमित लेखन करीत आहेत.

Leave a Reply